Extramarital Affair – भाग २ ( अंतिम भाग)

Love Stories-Relations

मागच्या भागात आपण पाहीले की आभा आणि मनिष‌ यांची बॅडमिंटन खेळताना ओळख होते आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीला सुरवात होते. आता‌ पुढे.

दररोज सकाळी आभा आणि मनिष बॅडमिंटन खेळण्याच्या निमित्ताने भेटायचे, खेळून झाल्यावर कधी ज्यूस घ्यायला तर कधी एकत्र नाश्ता करायला दोघेही जायचे. मनिष बडबड्या, विनोदी स्वभावाचा त्यामुळे आभाला त्याच्याशी गप्पा मारायला खूप मज्जा यायची. त्याच्यासोबत ती मनसोक्त हसायची.
एकदा सुजय नसताना‌ मनिष ने आभा ला सिनेमा ला जाण्या विषयी विचारले, तीही तयार झाली.
मनिष हा अविवाहित तरुण, एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करायचा. पार्टी, सिनेमा, फिरणं असं सगळं त्याला खूप आवडायचं. आता आभा सोबत मैत्री झाल्यावर तिलाही तो सोबत येण्यासाठी विचारायचा, या सगळ्या गोष्टींची आवड आभाला सुद्धा होतीच त्यामुळे मैत्रीच्या नात्याने ती तयार व्हायची.
अशा सगळ्या गोष्टींमुळे तिला मनिष ची सवय झाली होती. सुजय सोबत असताना, त्याच्या सोबत फिरताना ती पूर्वी सारखी आनंदी नसायची, आपण सुजय ला धोका देतोय हे तिला कळत होतं. सुजय जवळ यायला लागल्यावर तिला त्याची आधी सारखी ओढ वाटत नव्हती. काही तरी चुकतंय हे सतत जाणवतं असल्याने तिच्या आणि सुजय च्या नात्यात एक दुरावा निर्माण होत होता. सुजय खुपदा तिला विचारण्याचा प्रयत्न करायचा, म्हणायचा “आभा, तू हल्ली कुठल्या तरी विचारात असतेस, तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नसतं, काही प्रॉब्लेम तर नाही ना..कुठलं दडपण आहे का..मला सांग, मी नक्की मदत करेल तुला.. काय झालं आहे..”
त्यावर आभाचं उत्तर ठरलेलं असायचं, “नाही रे, दडपण वगैरे काही नाही..उगाच वाटतं तुला असं.. काहीही झालं नाहीये..”
वरवर असं बोलत असली तरी मनात मात्र मनिषचा विचार असायचा..तिला वाटायचं आपण मनिषच्या प्रेमात तर पडलो नाही ना..आपण चुकतोय का.. मनिष मला फक्त एक मैत्रीण मानतो पण मीच जास्त विचार तर करत नाही ना.. अनेक प्रश्न मनात येऊन सतत गोंधळ उडाल्या सारखं तिला वाटायचं. मनिष सोबत एकदा बोलाव‌ का याविषयी..की त्याला भेटायच टाळावं… सुजय माझा नवरा आहे..आमचं एकमेकांवर प्रेम आहे..मी उगाच मनिष कडे आकर्षित होत आहे..आता त्याला न भेटलेले बरे असा विचार करत तिने अचानक बॅडमिंटन खेळायला जायचे बंद केले.
आभा का येत नसेल म्हणून तिकडे मनिष सुद्धा काळजीत पडला, फोन केला तर आभा काही उत्तर देत नव्हती. अशेच तीन दिवस गेले..आभा ला हे तीन दिवस तीन वर्षांसारखे वाटत होते..सतत मनिष सोबत घालवलेले क्षण तिला आठवत होते तर एकीकडे सुजय चा विचार करून ती स्वतः ची समजुत काढत होती.
मनिष सुद्धा आभा ला न भेटल्यामुळे अस्वस्थ झाला होता. काय झालं असेल..आभा ठिक तर असेल ना…आभा च्या घरी जाऊन बघावं का अशे अनेक विचार तो करत होता. आपण आभाच्या प्रेमात पडलो आहे हे त्याला कळत होतं पण या नात्याला काही अर्थ नाही..आभा विवाहित आहे, तिच्या संसारात आपल्यामुळे काही विष पसरायला नको म्हणून तो स्वतः ला सावरत होता. एकदा आभा ला भेटून सगळं बोलून क्लीयर करावं म्हणजे अशी हुरहूर लागून राहणार नाही असा विचार करून त्याने आभा ला मेसेज केला, ” आभा, मला माहित आहे जे मला वाटतंय तेच तुझ्या मनात आहे.. आपलं नातं मैत्रीच्या पलिकडे जात आहे..वेळीच आपण थांबलो तरच योग्य राहील..तुझ्या आयुष्यात सुजय आहे..मला त्याची जागा घ्यायची नाही..पण एकदा मला भेट शेवटचं.. त्यानंतर मी परत तुला त्रास देणार नाही.. प्लीज मला भेट..”
आभा त्याचा मेसेज बघून रडायला लागली, तिचीही अवस्था वेगळी नव्हतीच . रडतच तिने रिप्लाय केला, ” आज सायंकाळी, ७ वाजता भेटूया..कुठे भेटायचं तू ठरव..”
मनिषचा रिप्लाय आला, “तुला हरकत नसेल तर माझ्या घरीच ये.. सविस्तर सगळं बोलता येईल..”
मागचा पुढचा विचार न करता आभा तयार झाली. ठरल्याप्रमाणे ती ७ वाजता मनिषच्या घरी पोहोचली. मनिष तिची वाटच बघत होता. घरात छान सुगंध दरवळत होता, सगळीकडे मंद प्रकाश, हॉलमध्ये टेबलवर सुंदर गुलाबांच्या फुलांचा गुच्छ असं प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. एकमेकांसमोर येताच आभाच्या डोळ्यात चटकन पाणी आले. कुठलाही विचार न करता तिने जाऊन मनिषला मिठी मारली.
मनिष ने ही तिला मिठीत घेतले, काही वेळ दोघेही काही बोलले नाही. नंतर आभाला मिठीतून सोडवत मनिष तिला म्हणाला, “मी मस्त पैकी जेवण मागवले आहे..आज आपण छान पार्टी करू.. मनसोक्त गप्पा मारू..आजचा दिवस आयुष्यभर लक्षात राहीला पाहिजे.. रडून हे क्षण खराब करायचे नाही..आता हस बघू..”
आभाने एक गोड स्माइल दिली.
मनिष -” आभा, आपली मैत्री झाली त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक क्षण मी आठवणीत जपून ठेवला आहे..मला तू खूप आवडतेस..तू आहेच इतकी गोड की कुणीही प्रेमात पडेल तुझ्या.. तसंच माझं झालं..पण मला माहीत आहे तू माझी होऊ शकत नाही..आपल्या नात्याचा प्रवास इथपर्यंतच होता असा समजुया..मला तुला आनंदात बघायचं आहे.. सुजय आणि तुझ्या मध्ये येऊन मला तुझं सुख हिरावुन घ्यायचं नाही. अचानक आपलं भेटणं बंद झालं तेव्हा मनात एक खंत वाटली.. गैरसमज मनात ठेऊन आयुष्यभर ते ओझं आपल्या मनात राहीलं असतं म्हणून आपल्या मैत्रीच्या प्रवासाचा शेवट गोड असावा म्हणून आज तुला बोलावलं मी..सोपं नसलं तरी आजच्या नंतर आपण भेटायला नको.. हळूहळू होईल सवय.. वेळ गेला ना की माणूस जुन्या गोष्टी विसरतो..तसंच आपणं पडू यातुन बाहेर..”
आभा मनिष च्या बोलण्याने अजूनच भावनिक झाली पण मनिष जे बोलतो आहे हे सत्य आहे हे तिलाही कळत होतेच.
मनिष ने मस्त मंद आवाजात गाणे लावले, दोघांनी एकत्र डिनर केला.. केक कापला…आज‌ मात्र ठरवूनही गप्पा काही होत नव्हत्या. विरहाची एक सल दोघांच्याही मनात बोचत होती.
मनिष ने न राहावून आभा जवळ मनातल्या भावना व्यक्त केल्या, “आय लव्ह यू आभा.. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर..आपण एकत्र येऊ शकत नसलो तरी माझं प्रेम हे खरं आहे..या प्रेमाची आठवण ठेव.. हसत रहा नेहमी…” असं म्हणत त्याने आभाला करकचून मिठी मारली.
दोघेही भावनिक झाले पण मनिषच्या बोलण्यावर तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
रात्री ११ वाजलेत तेव्हा आभा म्हणाली, “चल मनिष मी निघते.. उशीर झाला आहे..”
मनिषने तिला घरापर्यंत सोडले आणि वाटेतच म्हणाला “तू खरच खूप सॉलिड आहेस..आजची आपली शेवटची भेट..या शहरात राहून मी तुला विसरू शकणार नाही.. म्हणून ट्रान्स्फर साठी अर्ज केला आहे…”
आभा फक्त ऐकत होती.. काय बोलावं तिला काही कळत नव्हते. गाडीतून उतरताना इतकंच म्हणाली, “मनिष, तुझ्यामुळे जे क्षण मी खूप मनापासून एॅंजाॅय केले ते विसरणे अशक्य आहे..मी सुजय आणि माझ्या नात्यात यावरून दुरावा होऊ नये म्हणून नक्कीच प्रयत्न करेन पण तुझी आठवण मात्र कायम मनात असेल माझ्या…मला तू आवडतो पण प्रेम म्हणशील तर माझं प्रेम सुजय वर आहे रे…आपलं काय नातं आहे नाही माहीत मला..पण सुजय माझं पहिलं प्रेम आहे.. ”
मनिष हसत भावनांना आवरत म्हणाला, ” मला माहित आहे आभा, तू सुजय वर खूप प्रेम करते..आपल्या गप्पांमध्ये तोच तर असायचा नेहमी..किती सांगायची तू मला त्याच्या विषयी.. माझं तुझ्यावर मात्र खरं प्रेम आहे पण मला तुला कुठल्याही बंधनात अडकवायचे नाही.. म्हणून तर हा निर्णय घेतला आहे मी..”
आभा डोळे पाणावून, “चल मी निघते..बाय.. काळजी घे..”
दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला.

आभा घरी आली तर सुजय आधीच हजर होता.
सुजय दोन दिवसांपूर्वी आठवडाभरासाठी दुसऱ्या शहरात गेला होता पण काम लवकर संपल्याने तो लगेच परतला.
आभा त्याला बघताच गोंधळलेल्या अवस्थेत विचारू लागली “सुजय तू….तू तर आठवडाभरासाठी गेलेला..कधी आलास.. फोन का नाही केलास..कळवायचं तरी येतोय म्हणून..”
सुजय आभाला शांत करत, “अगं हो.. शांत हो… माझं काम लवकर संपलं म्हंटलं चला‌ तुला सरप्राइज देऊ तर तू घरी नव्हतीस..किती उशीर केलास घरी यायला.. फोनही लागत नव्हता तुझा..”
आभा जरा अडखळत बोलली, ” हा.. अरे मैत्रिणी कडे गेलेले.. उशीर झाला यायला..फोन बहुतेक बॅटरी संपली असेल..कळालेच नाही मला..”
सुजय -” बरं असो, तू जेवण करून आलीस का.. मी पार्सल मागवलं होतं दोघांसाठी पण तुझी वाट बघून खाऊन घेतलं मी..”
आभा – “हो मी जेवण करून आले..चल फ्रेश होऊन येते..तू पण थकला असशील ना..आराम कर..”
आभाच वागणं सुजय ला जरा विचित्र वाटलं पण बाहेरून आली शिवाय उशीर झाल्याने थकली असेल म्हणून त्याने जास्त खोलात जाऊन काही विचारले नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी आभा आंघोळीला गेली, तितक्यात आभाच्या फोनवर मनिष चा मेसेज आला आणि तो सुजय ने बघितला, तो विचार करू लागला
“आभा आपल्याला फसवत आहे, काल रात्री ही‌ मैत्रिणी कडे गेली नसून मनिष सोबत होती. मग मला खोटं का सांगितलं आभा नी”
आभा आंघोळ करून बाहेर येताच सुजय ने तिला मनिष विषयी आणि त्याच्या अशा‌ मेसेज विषयी जाब विचारला.

दोघांनीही बराच वेळ यावर चर्चा, वाद , राग संताप व्यक्त केला. आभा ने तिची चूक मान्य केली, माफी मागितली, एक संधी दे म्हणत विनवणी केली पण सुजय मनोमन खूप दुखावला होता. आभा अशा प्रकारे आपल्याला धोका देऊ शकते यावर त्याला विश्वास बसत नव्हता.

“कालची रात्र मी कधीच विसरू शकत नाही ” हे वाक्य सुजय ला खूप त्रास देत होते.
आभाने रडत रडत सुजय ला घडलेली सगळी हकीकत सांगितली. पण एकदा विश्वासात तुटल्याने आता सुजयला तिचा विश्वास बसत नव्हता.

” मनिष आणि मी आज शेवटचं भेटलो…आम्हाला कळालं आहे आमच्या नात्याला काही अर्थ नाही..तो आता शहर सोडून जाणार आहे..मी खरंच अपराधी आहे सुजय तुझी.. भावनेच्या भरात नकळत त्याच्यात गुंतले पण आकर्षक होतं ते..माझं खरंच प्रेम आहे रे तुझ्यावर…मला एक संधी दे..”

आभाच्या या बोलण्यावर कसाबसा विश्वास ठेवून तिच्या वरच्या प्रेमापोटी सुजयने तिला एक संधी दिली, पण दोघांच्या नात्यात एक दुरावा मात्र होताच.. एकत्र संसार करत असले तरी एकदा गमावलेला विश्वास आता परत येणं शक्य नव्हतं. आभा सुजय चा विश्वास परत मिळविण्याच्या सतत प्रयत्न करत होती, तोही तिला सुखी ठेवण्यासाठी धडपड करत होताच. पण त्या नात्यात आता पूर्वीसारखा गोडवा कायम नव्हता… एकत्र आनंदी दिसत असले तरी आभाच्या मनात अपराधी भावना तर सुजयच्या मनात एक अविश्वास होता, हि भावना बदलणे आता खरंच अवघड झाले होते.
अशाच भावना मनात दडवून दोघे संसार करत होते.

खरंच , नवरा बायको यांच्यातलं नातं हे प्रेम, विश्वास यावरच टिकून असतं. एकदा विश्वासाला तडा गेला की नात्यातला गोडवा कमी होत जातोच पण सोबतच जी अविश्वसाची भिंत दोघांमध्ये निर्माण होते ती क्वचितच दूर होते.

याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed