ईशा स्वभावाने हळवी, दिसायला सुंदर, नाजूक चेहरा, लांबसडक केस, गव्हाळ वर्ण आणि सर्व गुण संपन्न मुलगी. जितकी घरकामात तरबेज तितकीच कला तिच्या हातात. सुरेख रांगोळ्या, तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच. घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायची ती. ग्रॅज्युएशन झालं तेही डिस्टिंगशन मिळवून.
आई वडीलांची लाडकी लेक, घरात मोठी, तिच्या पाठोपाठ दोन लहान बहिण भाऊ, त्यांचीही लाडकी ताई. आई बाबा रागावले की ताई हट्ट पुरविते ते पण उत्तमरित्या समजुत काढून हेही त्यांना माहीत होते.
ईशाची एकच कमजोरी आणि ती म्हणजे ‘कोण काय म्हणेल’ असा विचार करत स्वतः चे मन मारणे.
वयाच्या एकविसाव्या वर्षी एक स्थळ सांगून आलं. मुलगा मुंबईत चांगल्या नोकरीला आहे, सधन कुटुंब आहे, राणी बनून राहीलं बरं का ईशा असं ईशा च्या आत्याबाई ने सांगताच बाबांनी ईशाच्या लग्नाचं मनावर घेतलं. ईशा सांगू पाहत होती, “बाबा मला पुढे नोकरी करायची आहे, आताच लग्न नको” पण आई बाबांनी तिचीच उलट समजुत काढली आणि म्हणाले ,
” अगं नोकरीचे काय, मुंबईत आहे मुलगा. लग्नानंतर तिथे गेली की शोध नोकरी. होणार्या नवर्याची मदतच होईल तुला..”
ईशाला कुणाचं मन मोडणं जमत नव्हतंच, हे तर आई बाबाचं. ती स्वतः चे नोकरीचे स्वप्न बाजुला ठेवून घरच्यांचा विचार करून लग्नाला तयार झाली. कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला, अमन दिसायला देखणा, चांगल्या नोकरीला शिवाय त्याला ईशा पहिल्या भेटीतच आवडली मग काय ठरलं दोघांचं लग्न.
अमन आणि ईशा फोनवर बोलायचे, तिला एकंदरीत तो चांगला वाटला पण मनात अजूनही एक खंत होतीच लवकर लग्न करतोय आपण याची.
दोघांचं लग्न झालं, अमन तिला छान सांभाळून घ्यायचा, मुंबई सारख्या शहरात ती पहिल्यांदाच आलेली पण अमनने तिला तसं भासू दिलं नाही, नवनवीन ठिकाणी फिरायचे, हौसमौज करायचे, सगळं अगदी छान. लग्नाला सहा महिने होत आले, ईशा नविन घरात बर्यापैकी रुळली. आता आपण नोकरीसाठी विचार करायला हवा असं ठरवून अमनकडे तिने ते बोलून दाखवलं.
त्यावर अमन तिला म्हणाला , “ईशा, तुला नोकरी करायची ना..बिंदास कर पण तुला लोकल ने प्रवास, दगदग जमेल का..तू तयार असशील तर मी नक्कीच मदत करेल.”
ईशा ने अमनच्या प्रश्नाला होकार दर्शवत नोकरीचे मनावर घेतले आणि तसा प्रयत्न सुरू केला. अधूनमधून पहिला सण म्हणून वर्ष भर सासर माहेर वारी सुरु होतीच. नोकरीचे प्रयत्न सुरू होत नाही तोच ती आई होणार असल्याचे तिला कळाले. इतक्या लवकर बाळ, जबाबदारी नको वाटत होतं तिला पण अमन, सासूबाई, आई सगळ्यांनी तिचीच समजुत काढली की “अगं आता राहीलं तर होऊन जाऊ दे एक मुलं, वय वाढलं, अबॉर्शन केले की पुढे मुलं होताना फार त्रास होतो.. नोकरी काय नंतरही करू शकतेच..”
आताही ती काही बोलू शकली नाही, बाळ होण्याचा आनंद तिलाही अनुभवायचा होताच पण इतक्या लवकर बाळ मनाविरुद्ध वाटत होतं..पण असो म्हणत तिने मातृत्व स्विकारले. एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता बाळामध्ये ती इतकी गुरफटलेली की घर, अमन, बाळ याशिवाय आयुष्य असते याघा तिला काही काळ विसर पडला, वेळही तशीच होती म्हणा.
मुलगा दोन वर्षांचा झाल्यावर तिने परत मिशन नोकरी शोधा सुरू केले. योगायोगाने तिला एक नोकरी मिळाली ती सुद्धा घरा पासून काही अंतरावर, आता बाळा जवळ कुणाला ठेवायचे. इकडे सासुबाई तिकडे आई त्यांच्या जबाबदारीत अडकलेल्या त्यामुळे नेहमी साठी येणे त्यांना जमणार नव्हते. मग डे केअर चा ऑप्शन शोधला आणि नोकरी सुरू केली. पण मुलाला डे केअर ला सोडून, घर सांभाळून नोकरी करताना तिची तारांबळ उडायची शिवाय इवल्याशा जीवाला डे केअर ला सोडून जाताना ती मनोमन खूप रडायची. घरचे आणि अमनही तिलाच दोषी ठरवायचे, म्हणायचे “तुलाच नोकरीची हौस..”
कसंबसं पाच सहा महिने तिने धावपळ करत नोकरी केली पण मुलगा डे केअर ला गेल्यापासून सारखा आजारी पडतोय, रडत रडतच आई मला जायचं नाही तिथे म्हणतोय बघून तिने ती नोकरी सोडली. या दरम्यान तिची फार चिडचिड व्हायची, हळवी असल्याने इतरांचे मन जपताना स्वतः मनोमन खूप रडायची. अमन आणि ईशा मध्ये यादरम्यान लहान सहान गोष्टींवरून खटके उडायचे कारण दोघांना एकमेकांसाठी वेळच नव्हता.
नोकरी सोडल्यावर घर,नवरा, मुलगा सगळी जबाबदारी सांभाळत ती स्वतः साठी जगायचं विसरून गेली होती. काही महिन्यांनी मुलाची शाळा सुरू झाली, एकदा का मुलं मोठी व्हायला लागली की पुढचे वर्ष कसे भरभर जातात हे आता तिला कळत होतं.
तिचं स्वप्न, तिच्या आवडीनिवडी सगळं ती काही काळ का होईना विसरूनच गेली होती. नातलगांचा आदरसत्कार, प्रत्येकाचं मन जपणं सगळं न चुकता ती करत आली होती. अशीच जबाबदारीच्या ओझ्याखाली वर्षे भराभर निघून गेली.
आज ईशाचा चाळीसावा वाढदिवस होता, मुलगा पार्थ सुद्धा एव्हाना अठरा वर्षांचा झाला होता. अमन आणि पार्थ दोघांनी मिळून मस्त सरप्राइज पार्टी अरेंज केली. ईशा मस्त अमन ने दिलेली साडी नेसून तयार झाली, एका मैत्रिणी च्या मदतीने हलकासा मेकअप केला, तिचं सौंदर्य आज उठून दिसत होतं.
ईशा ला घेऊन दोघेही पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. बघते तर काय आई बाबा भावंडे सासू सासरे , काही मित्र मैत्रिणी सगळेच तिथे हजर. सगळ्यांनी ईशाचे भरभरून कौतुक केले, प्रत्येक जण ईशा विषयी दोन-चार ओळी छान छान बोलत होते आणि पार्थ सगळं रेकॉर्ड करत होता. सगळ्यांकडून कौतुक ऐकताना ईशाच्या मनात विचार आला,
“आपण सगळ्यांसाठी इतकं सगळं केलं त्याची पावती तर मिळाली पण आतापर्यंतचं आयुष्य सगळ्यांसाठी जगताना स्वतः साठी जगायच तर राहूनच गेलं..आता पार्थ मोठा झाला, चाळीशीचा उंबरठा ओलांडून आज मी नव्याने स्वतः साठी ही जरा वेळ काढणार, आवडीनिवडी जपणार..नोकरीचे माहीत नाही पण आता जरा का होईना स्वतः साठी जगणार , नाही तर साठी उलटताना परत एकदा वाटेल स्वतः साठी जगायचं राहूनच गेलं….”
टाळ्यांच्या आवाजाने ती विचारातून बाहेर पडली, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणून आता जरा वेळ का होईना पण स्वतः साठी जगायचं असं मनोमन ठरवून तिने केक कापला.
खरंच विचार करण्याजोगे आहे नाही का?
ईशा प्रमाणे आपणही असंच अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी जगायचं विसरून जातो. जेव्हा जाणिव होते तेव्हा कशात रस नसतो पण आयुष्य एकदाच मिळते तेव्हा जरा का होईना स्वतः साठी वेळ काढून आवडीनिवडी जपत, आपला आनंद शोधून स्वतः साठी जगायचं मनावर घ्यायलाच पाहिजे नाहीतर आपल्यालाही म्हणावं लागेल, ” स्वतः साठी जगायचं तर राहूनच गेलं…”
याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed