आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग अंतिम

Love Stories

अमन डायरी हातात घेऊन नदी किनारी गेला. नदीचे पाणी स्थिर पणे वाहत होते, आजुबाजूला दुरवर पसरलेली झाडे अमन बघत होता. त्याला या किनाऱ्यावरची आरती सोबतची भेट आठवली. तिच्या आई सोबत तर कधी एकटीच ती या नदी किनारी कपडे धुवायला यायची. अशीच एकदा एकटी आलेली तेव्हा अमन घरच्यांच्या लपून छपून तिला भेटायला नदीवर गेलेला. गुलाबी रंगाचा अगदी साधासा सलवार कमीज घालून आपल्या लांबसडक केसांची वेणी सांभाळत ती कपडे धुण्यात व्यस्त होती. अमन लांबूनच तिला न्याहाळत बसलेला. आजुबाजूला गावातील काही बाया सुद्धा धुणी धुवायला तिथे आलेल्या होत्या. जशा त्या बायका तिथून गेल्या तोच अमन धावत जाऊन आरतीला भेटला‌. अमनला बघताच तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली होती. बोलायला शब्द सुचत नव्हते पण आजुबाजूला बघत ती म्हणाली, “अमन अरे असं एकांतात आपल्या दोघांना कुणी बघितले तर गावात उगाच अफवा पसरतील…”

तिच्या डोळ्यात बघतच तो म्हणाला, “किती सुंदर दिसतेस गं आरती तू…तुला भेटण्याची संधी बघत इथे आलो‌ आणि तू पळवून लावतेस…”

ती लाजतच इकडे तिकडे बघत होती आणि अमन तिला बघत होता.

ती गोड भेट आठवत असताना एक वार्‍याची गार झुळूक त्याला जवळून स्पर्शून गेली आणि तो भानावर आला. नदी किनारी बसून त्याने डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली.

तिने त्या नदीवरील दोघांच्या भेटीचे छान वर्णन केले होते. तिच्या मनातल्या भावना, प्रेम, त्याला भेटल्यावर झालेला आनंद अगदी छान शब्दात उतरविला होता.

पुढे पान बदलले तसेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यात लिहीले होते,

“अमन, त्या दिवशी नदी किनारी आपण भेटलो‌ हे गावातल्या पाटलांच्या दिनूने बघितलं. आपल्या विषयी त्याला संशय आला. तू परत गेल्यावर त्याने एकदा मला असंच एकटं बघून गाठलं आणि आपल्या दोघांविषयी विचारलं. त्याची माझ्यावर वाईट नजर होती. त्याला मी आवडते, माझ्याशी त्याला लग्न करायचं असं तो मला बोलून गेला पण मी काहीही न बोलता तिथून निघून गेली. त्यानंतर रोज कुठे ना कुठे तो माझा पाठलाग करत राहीला. मी त्याला भाव देत नाही त्याच्या प्रश्नांना उडवून लावते हे त्याला कळालं तसाच तो चिडला. गपगुमान मला हो‌ म्हण नाही तर गावात तुझी बदनामी करतो, तुझ्या घरच्यांना गावात राहणे मुश्किल करतो अशा धमक्या तो देत राहीला. मी खूप घाबरली अमन..तू कधी एकदा येतोस आणि मला यातून सोडवितो असं झालेलं मला..त्याच्या विषयी कुणाला सांगावं हे मला कळत नव्हतं… त्याचा अख्ख्या गावात दरारा..कुणी त्याच्या विरोधात जाणार नाही हे माहीत असल्याने काय करावं मला कळत नव्हतं. मला एकटीला घरातून बाहेर पडायला पण भिती वाटत होती अमन..मी फक्त तुझी वाट बघत होते. तू आलास की सगळं काही ठीक होईल म्हणून मी दिवस मोजत होते… वर्ष संपत होते…”

इतकंच काय त्या डायरीत लिहीलं होतं.
पण पुढे काय? हा प्रश्न अमनला पडला तितक्यात आरतीचा भास त्याला झाला.

“अमन, एक दिवशी त्या दिनूने मला नदीवर एकटी बघून गाठलं. आईची तब्येत बरी नसल्याने मी एकटीच नदीवर आलेली. त्याने संधीचा फायदा घेत माझा हात धरून लग्नासाठी तयार हो म्हणत हट्टच धरला. मी नाही म्हणत त्याला एक कानाखाली वाजवली. तो‌ माझ्या अशा वागण्याने चिडला, तुला सोडणार नाही. बघून घेतो म्हणत त्या क्षणी तर तिथून निघून गेला पण मी भितीने कापत होते, रडत होते. आता झाला प्रकार आई बाबांना सांगायला पाहिजे म्हणून मनात ठरवलं पण झालं उलटच. मी घरी गेले तर  बाबा आईला तालुक्याला घेऊन जायला निघत होते. आईला डॉक्टर कडे घेऊन जातो आणि सायंकाळी परत येतो म्हणत आई बाबा बाहेर पडले. मी घरात एकटीच खूप रडले‌. तुझ्या मामी सुद्धा माझी चौकशी करायला आलेल्या तेव्हा त्यांना सांगू की नको असं झालेलं मला… काही वाटलं तर हाक मार, घरी ये म्हणत त्या निघून गेल्या. त्या दिवशी मी मामीला माझी परिस्थिती सांगितली असती तर कदाचित मी आज जिवंत असते. दिवसभर मी दार लावून घरातच होते. सायंकाळी आई बाबांना यायला जरा उशीर झाला आणि अंधाराचा फायदा घेत दिनू घरी आला. दार ठोठावले तेव्हा आई बाबा आले असं समजून मी दार उघडले तर दिनू होता. त्याने घरात शिरून माझ्यावर अत्याचार केला, माझ्या इज्जतीवर हात टाकला. त्याच्यापुढे माझी ताकद कमी पडली, मला प्रतिकार करता आला नाही. आता माझ्याशी लग्न केल्याशिवाय पर्याय नाही म्हणत तो कुत्सितपणे हसून निघून गेला. मी अंगावरचे कपडे सावरत रडत होते. आई बाबा उशीरा घरी आले, दोघेही दमून भागून आल्यावर जेवण करून झोपी गेले. मी रात्रभर रडत राहीली, वेदनेने तडफडत राहीली. झाल्या प्रकाराने माझ्या अंगात ताप भरला होता, मनात भितीने कापत होते मी पण यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दिसत नव्हता अमन. आई बाबांनाही मी काही सांगू शकले नाही. काही दिवस मी घरातल्या घरातच होते, बाहेरच्या जगाची भिती वाटत होती मला. परत एक दिवस घराबाहेर पडावे लागले आणि भर दुपारी आजुबाजूला कुणीही नाही बघून दिनूने माझे अपहरण केले त्याच्या गाडीतून मला शेतातल्या झोपडीत घेऊन गेला. हवा तसा उपभोग घेतला. मी सायंकाळी घरी आली नाही म्हणून आई बाबा गावभर मला शोधत होते. ही गोष्ट दिनूला मित्रांनी कळविली तेव्हा तो‌ घाबरला. आपलं सत्य गावकर्‍यांसमोर आलं तर कुटुंबाची प्रतिष्ठा खालावली जाईल, बदनामी होईल म्हणून त्याने परत परत माझ्यावर राग काढत अत्याचार केला आणि अखेरीस गळा आवळून मला ठार मारले. रात्री अंधाराचा फायदा घेत माझ्या अंगावर नीट चढवून नदीत फेकून दिले. दुसऱ्या दिवशी माझा मृतदेह नदीतील दगडाला अडकलेला सापडला तेव्हा तो परत घाबरला, त्याने मित्राच्या मदतीने माझ्या घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली, त्यात होते “मी आरती, माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याने मला धोका दिला म्हणून मी स्वतःला संपविते आहे.”

गावकर्‍यांना वाटले मी प्रेमभंग झाल्याने आत्महत्या केली पण माझ्यावर किती अत्याचार झाला हे कुणालाच माहीत नाही अमन.
योग्य वेळी मी आई बाबांना, तुझ्या मामींना हे सांगितले असते तर अशाप्रकारे माझा शेवट झाला नसता. काही तरी पर्याय नक्कीच निघाला असता.

अमनला हे सगळं ऐकून मोठा धक्का बसला. माझ्या आरतीचा न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्याने दिनूला भेटायला बेत आखला. त्याने सायंकाळी दिनूला गाठले. अमनला बघताच दिनू जरा गोंधळला पण ह्याला कुठे काय माहित म्हणून त्याने मनातला गोंधळ लपवत त्याच्याशी हाय हॅलो केले. गप्पांच्या ओघात अमन त्याला आज एकत्र जेवण करू म्हणत दारु मिळेल अशा एका धाब्यावर घेऊन गेला. दिनू काही ना काही बहाना देत नाही म्हणता म्हणता शेवटी तयार झाला. अमन ने जेवताना दारुचा ग्लास दिनूच्या पुढे करत इकड तिकडच्या गप्पा मारल्या आणि शेवटी आरतीचा विषय काढला. सुरवातीला दिनू काही त्यावर बोलत नव्हता, अमन त्याच्या तोंडून सत्य बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. बराच वेळ आरतीचा विषय काढल्यावर , जसजशी दिनूला नशा चढली तसा तो जरा जरा बोलू लागला, “मस्त आयटम होती यार ती..पुरी लाइफ तिच्या सोबत मज्जा करणार होतो, लगीन करणार होतो पण साली तयार होत नव्हती. तुझ्यासोबत लफड होतं का रे तिचं.. म्हणूनच मला नाही बोलली ती..पण मी सोडली नाही तिला, मज्जा केली तिच्या संग अन् दिली फेकून नदीत..कुणाला कळालं बी नाही..”

अमन ने दिनूचे सगळे बोलणे त्याच्या नकळत फोनमध्ये रेकॉर्ड केले. रात्री उशिरा घरी आल्यावर अमन ने आरती विषयी त्याच्या भावना, तिच्या मृत्यूचे सत्य, पुराव्यानिशी मामांना सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मामांच्या मदतीने दिनूच्या विरूद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदविली, पुरावे दाखल केले. दिनूला काही कळण्याच्या आत त्याला अटक झाली आणि वर्षभराने का होईना पण आरतीच्या मृत्यूचे सत्य सर्वांसमोर आले.

अमनने अखेर आरतीला न्याय मिळवून दिला, तिला मुक्ती मिळाली. अमनला होणारा तिचा भास आता जाणवत नव्हता पण ज्यांनी तिच्यावर अन्याय केला, तिच्या चारित्र्यावर शिंंतोडे उडविले त्याला शिक्षा सुनावली गेली याचे अमनला समाधान वाटले.

अमनचं पहिलं प्रेम या जगात नव्हतं पण तिच्या आठवणी त्याच्या मनात अमर होत्या.
या आठवणी नव्याने मनात साठवून अमन शहरात परत गेला.

समाप्त.

मी लिहीलेली ही कथा कशी वाटली हे नक्की कळवा 😊

ही कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी याचा कांहीही संबंध नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed