फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग दुसरा

Love Stories

दारात अजिंक्य ची आई हातात ताट घेऊन उभी.. प्रचिती ने आईंना बघताच तिला जणू लक्ष्मीचा भास झाला.. उंचपुरा बांधा,नीट नेसलेली बारीक किनार असलेली कॉटनची साडी, कपाळावर इवलिशी

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

 

लालचुटुक टिकली, दोन्ही खांद्यावर पदर, हातात आरतीचे ताट आणि प्रसन्न हसरा चेहरा.
त्यांनी प्रचिती ला दारातच ओवाळून भाकरीचा तुकडा तिच्या अंगावरुन उतरवून दाराच्या बाजुला टाकला आणि हसतमुखाने म्हणाल्या, “ये बाळा आत..”

प्रचिती आत आली आणि हळूच वाकून अजिंक्यच्या आईला नमस्कार केला. त्यांनीही, “सुखी रहा बाळा..” म्हणत आशिर्वाद दिला.
असं स्वागत प्रचिती पहिल्यांदाच बघत होती. तिला सगळं खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. तिचे हावभाव बघत रेश्मा म्हणाली, “ताई, आईनी दृष्ट काढली तुमची दारात.. म्हणजे बाहेरून असं कुणी आलं ना, त्यातल्या त्यात पहिल्यांदा तर असं ओवाळून स्वागत करतात आमच्याकडे..”

प्रचिती – “खरंच खूप छान वाटलं मला… सगळं माझ्यासाठी नवीन आहे..”

रेश्मा तिच्या आईला म्हणाली, “आई, प्रचिती ती किती सुंदर आहे गं…मला तर टिव्हितल्या नटीला भेटल्या सारखं वाटत आहे..”

तिच्या बोलण्याने सगळेच खळखळून हसले. आई म्हणाली, “खरंच खूप गोड आहेस बाळा तू..दमली असशील ना..रेश्मा सोबत वरच्या खोलीत जा..आराम कर..मी मस्त गरमागरम चहा नाश्ता आणते..”

प्रचिती- “दमली नाही हो..उलट इथे येऊन एकदम फ्रेश वाटतंय मला..त्यात तुम्हा सगळ्यांना भेटून तर‌ वाटतच नाहीये की मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटले म्हणून..”

रेश्मा प्रचिती ला फ्रेश व्हायला वरच्या खोलीत घेऊन गेली. पाठोपाठ अजिंक्य सुद्धा बॅग घेऊन आला. प्रचिती साठी एक खोली छान तयार करून ठेवलेली होती. खोलीच्या खिडकीतून निसर्ग सौंदर्य अगदीच मनमोहक दिसत होते. बेड जवळ टेबलावर छान ताजी जरबेरा ची फुले फ्लॉवर पॉट मध्ये ठेवलेली होती. सगळं काही बघून प्रचितीच्या मनात विचार आला, “इतक्या उत्साहाने एका अनोळखी पाहुणी साठी कुणी कसं काय सगळं करू शकतं..किती प्रेमळ आहेत ही लोकं.. मुंबईत आपण अगदी बालपणापासून राहतोय पण किती फॉर्मल रिलेशन्स असतात सगळ्यांचे..खरंच किती गोड अनुभव आहे हा..”

प्रचिती ची आई हातात ट्रे मध्ये चहा नाश्ता घेऊन आल्या. “बाळा, नाश्ता करून घे..” म्हणताच प्रचिती विचारातून बाहेर आली.
रेश्मा लगेच म्हणाली “अरे हा ताई, तुमच्यासाठी बिसलेरी पाणी बॉटल आणल्या आहेत.. लगेच घेऊन येते मी.. इथलं पाणी सहन होते की नाही कुणास ठाऊक म्हणून आईने कालच दादाला बाटल्या आणायला सांगितलं होतं.”

प्रचितीने लगेच अजिंक्य च्या आईला “थ्यॅंक्यू काकू..किती प्रेमळ आहात हो‌ तुम्ही…मी अनोळखी असूनही इतकं सगळं माझ्यासाठी…”

“इतकं काय गं त्यात… अतिथी देवो भव्… बाकी काही नाही..”

दोघीही त्यावर गोड हसल्या. तितक्यात प्रचितीचा फोन वाजला. प्रचिती जीभ चावत म्हणाली, “ओह नो..मी मम्मा ला फोन‌ करायलाच विसरले..पोहोचले म्हणून सांगायचं राहूनच गेलं..”

फोन उचलताच तिकडून आई, “प्रचिती, अगं पोहोचली का नीट…साधा फोन नाही केला तू… रात्रभर झोप नाही लागली गं इकडे मला..”

“मम्मा मी अगदी व्यवस्थित पोहोचली आणि आता घरी आलीय.. इकडे सगळे इतके गोड आहेत ना, व्हेरी केअरींग…तू बिलकुल काळजी करू नकोस.. दुपारी व्हिडिओ कॉल वर ओळख करून देते तुझी इकडे सगळ्यांशी..ओके..लव यू मम्मा..टेक केअर..चल‌ बोलूया नंतर..बाय..”

अजिंक्यच्या आईच्या हातचे गरमागरम पोहे आणि कडक चहा पिऊन प्रचितीला अगदी फ्रेश वाटले. तिने तिची फाइल बॅगेतून बाहेर काढली आणि जिन्यातून खाली येत अजिंक्य ला म्हणाली, “चला मग आजच करूया का सुरुवात कामाला…सगळ्यात आधी तुमच्याविषयी म्हणजेच तुम्ही इतकी मोठी निरनिराळ्या फुलांची शेती करण्याची सुरुवात अशी केली याचा एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला…”

अजिंक्य – “चालेल‌ ना..जाऊया का मग शेताकडे..”

दोघेही शेताच्या दिशेने जायला निघाले. इतकी सुंदर फुलांची शेती बघून प्रचिती भारावून गेली. मळ्याच्या मधोमध पोहोचताच ती अजिंक्य ला म्हणाली, “इथे थांबून करूया व्हिडिओ.. परफेक्ट व्ह्यू आहे. अजिंक्यने हसर्‍या चेहर्‍याने नुसतीच मान हलवून होकार दिला.
प्रचिती ने तिचा कॅमेरा ट्रायपॉड वर नीट सेट केला आणि अजिंक्य ला कॅमेरा समोर उभे राहायला सांगितले. असं कॅमेरा समोर उभं राहून काय बोलावं त्याला काहीच कळत नव्हते, तो जरा निराश झाला. त्याचे भाव बघून प्रचिती म्हणाली, “काय झालं? मला घाबरलात की काय…एकदा आजुबाजूला नजर फिरवून बघा, तुम्ही किती सुंदर शेती उभी केली आहे. ती उजव्या बाजूला रंगबिरंगी जरबेरा ची फुले, इकडे गुलाबाचे कितीतरी प्रकार, तिकडे मागे ती झेंडूची सुंदर फुले सगळे तुमच्या मेहनतीचे फळ आहे. मग हा सगळा प्रवास तितका आठवून बघा, तो फक्त मी या कॅमेरात कैद करणार आहे..😊”

अजिंक्य ने आजुबाजूला नजर फिरवली आणि बोलायला लागला, “खरं सांगायचं तर या शेतीतल्या मातीशी माझं नातं हे जन्मापासूनच आहे. आमचे वडील त्यांना आबा म्हणायचो आम्ही. ते हा सगळा डोलारा सांभाळायचे, त्यावेळी ते हंगामी पीक घ्यायचे. खूप मेहनत करायचे. ते फार शिकलेले नसले ना तरी त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करायची हे खूप छान जमायचं. त्यांचं बघत बघतच मला शेतीत आवड निर्माण झाली. गावच्या शाळेत बारावी झाल्यावर जिल्ह्याला बॉटनी म्हणजेच वनस्पती शास्त्र यात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचं ठरवलं. मनाप्रमाणे बी एस सी बॉटनी मध्ये अभ्यासक्रम सुरू केला. मूळात त्यात आवड असल्याने आनंद गगनात मावेनासा झाला होता.‌आबा सुद्धा खूप आनंदी होते. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होतो मी तेव्हा..अचानक आबा गेल्याने आई पार खचून गेलेली. आबा आईला नेहमी सांगायचे, मी गेलो‌ ना तरी माझ्या नावाचं कुंकू पुसून टाकू नकोस.. लालचुटुक कुंकू तुझ्या कपाळावर शोभून दिसतं. खूप वेगळे होते आबा… त्यांच्याविषयी बरंच काही आहे ते सांगतो निवांत..आता फुलांवर येतो..
माझं कॉलेज अजून संपलेलं नव्हतं, इकडे शेतात गहू काढायला आलेले होते. आबा गेल्याने शेती सांभाळायला कुणीच नव्हतं , गुरेढोरे शिरून नुकसान करून जायची. आईने स्वतःला सावरलं, शेतीचा भार स्वतःवर घेतला‌. माझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून ती वर्षभर एकटीच झटत होती. गावाबाहेर फार्म हाऊसवर आई आणि रेश्मा दोघीच राहायला त्यामुळे माझंही मन तिकडे लागेना , मग अधून मधून मामा मामी इकडे येऊन राहायचे, कधी मी यायचो सुट्टी असली की. शेवटचं वर्ष कसंबसं काढून माझं कॉलेज मी पूर्ण केलं आणि या शेतीची सगळी जबाबदारी स्वतः कडे घेतली‌. मला मुळात फुलांची फार आवड होती आणि तसंही हंगामी पिके घ्यायला आबा सारखं जमेल की नाही याची खात्री नव्हती. मग फुलांच्या शेतीवर अभ्यास केला आणि हळूहळू एक एक प्रकारच्या फुलांची लागवड सुरू केली. त्याला आवश्यक तिथे शेड, त्याची योग्य निगराणी, त्याचं मार्केटिंग सगळं काही नीट समजून घेतलं आणि वर्षभरात ही रंगिबेरंगी फुलांची शेती तयार झाली. फुलांना बाहेरून मोठ्या प्रमाणात मागणी येते.. खूप समाधान मिळत या हसर्‍या फुलांना बघून..”

अजिंक्यचा प्रवास ऐकून प्रचिती च्या डोळ्यात पाणी आले. तो ही आबांच्या आठवणीने जरा हळवा झालेला. प्रचिती टाळ्या वाजवून म्हणाली, “खूप खूप छान अजिंक्य..तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात.. कौतुकास्पद प्रवास आहे तुमचा.. खूप काही शिकण्यासारखं आहे ह्यातून.. सॉरी तुम्हाला भावनिक केलं मी.. बरं आजच्या साठी इतकंच बसं..पुढे मग एक एका प्रकारच्या फुलांविषयी जाणून घ्यायचं आहे ते उद्यापासून करूया..”

“ओके मॅडम.. काही हरकत नाही..”

दोघांनी पूर्ण शेतीत फेरफटका मारला. प्रचिती खूप उत्साहात होती. अगदी लहान मुलांप्रमाणे बागडत सगळ्याचा आनंद घेत होती. अजिंक्य ने तिला असं बागडताना बघितलं आणि क्षणभर तो‌ हरवून गेला. चेहऱ्यावर गोड हास्य आणून तो तिला बघतच राहीला. ती जवळ येत बोटांनी चुटकी वाजवून म्हणाली, “कुठे हरवलात मिस्टर अजिंक्य…”

चटकन भानावर येत तो स्वतः शी लाजत म्हणाला, “सॉरी तुम्हाला इतकं आनंदी बघून मनातून खूश झालो बघा मी…एक सांगू का..?”

“बिनधास्त सांगा”

“मॅडम, तुम्ही हसताना फारच गोड दिसता..”

इतकं बोलून परत त्याने जीभ चावली आणि स्वतः ला म्हणाला, “अज्या, काय बडबडतो आहे…काय म्हणतील मॅडम..”

प्रचिती मात्र त्यावर हसून म्हणाली, “बसं इतकंच… थ्यॅंक्यू बरं का..”

दोघेही खळखळून हसले. अजिंक्य घड्याळ बघत तिला म्हणाला ,” जवळच नदी आहे.. तुमची हरकत नसेल तर चला जाऊया तिकडे जरा वेळ..तासाभरात जाऊ मग घरी, जेवायला..”

प्रचिती उत्साहात म्हणाली, “वाव..नदी…माझी काय हरकत असणार…मला तर हे सगळं खरंच खूप आवडतं आहे..चला जाऊया…”

दोघेही नदीच्या दिशेने निघाले.

क्रमशः

कथा मोठी असल्याने भागांमध्ये लिहीत आहे. पुढचा भाग लवकरच पोस्ट करू.

कथेचा हा दुसरा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed