रुपा आज अगदीच उत्साहात होती. कारणही तसेच होते, तिच्या स्वप्नातला राजकुमार आज तिला भेटणार होता. परी कथेतल्या राजकुमाराची स्वप्न बघणारी रुपा दिसायला अतिशय सुंदर, सुडौल बांधा, लांबसडक केस, निळसर डोळे, गालावर खळी. नावाप्रमाणेच रुपवान, अगदीच लाडात कौतुकात वाढलेली. गावात मोठा वाडा, एकत्र कुटुंब, त्यात आजी आजोबा, आई बाबा, दोन काका काकू, एकूण सहा भाऊ आणि त्या सगळ्यात रुपा एकुलती एक लाडकी बहीण शिवाय सगळ्यात लहान. मग काय ताईसाहेबांचा तोरा बघायलाच नको. अगदी फुलाप्रमाणे जपायचे सगळे तिला. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून रूपा गावातल्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करायची. आवाज सुरेख असल्याने गायनाचे क्लास सुद्धा घ्यायची.
रुपा आजीकडून लहानपणापासून परी कथा ऐकत आलेली आणि मनात कुठेतरी असेच राजकुमाराचे स्वप्न रंगवत बसायची.
कितीही लाडाची लेक असली तरी भविष्यात काळजी नको म्हणून आई आणि काकूंनी तिला घरकामात, स्वयंपाक करण्यातही तरबेज बनविले होते. अगदी सर्वगुणसंपन्न म्हणून रुपाची चर्चा गावात असायची.
जशीच ती वयात आली तसे तिचे सौंदर्य बघता तिला बरेच स्थळ यायचे पण तिच्या तोलामोलाचा राजकुमार काही एव्हाना गवसला नव्हता.
कधी घरच्यांना पसंत नसे तर कधी रुपाला पसंत नसे. गावात वावर असला तरी रुपाच्या घरी सगळे आधुनिक विचाराचे त्यामुळे तिचे मत लक्षात घेऊनच राजकुमाराचा शोध सुरू होता.
एक दिवस रुपा गायन क्लास घेऊन परत आली तसंच दादाने तिला चिडवत एक लिफाफा हातात दिला आणि म्हणाला, ” हे बघ आम्ही तुझ्यासाठी मुलगा पसंत केलाय, फोटो वरून अगदी चाळीशी पार केलेला दिसतोय, डोक्यावर केस मोजकेच आहेत शिवाय भिंगाचा चष्मा लावतो असं दिसतोय. पण मोठ्या हुद्द्यावर नोकरीला आहे बरं का..तेही मोठ्या शहरात..बघ जरा आवडतो का..”
रुपा दादाचे बोलणे ऐकून त्याच्या मागे धावली. अगदी मांजर बोका सारखे दोघेही बहीण भावाची मज्जा मस्ती सुरू झाली. सोबतीला इतर भावंडे होतीच. चिडून म्हणाली, “मला नाही करायचं लग्न जा… फोटो पण नाही बघायचा..तूच बघ..”
ती चिडक्या सुरात रडकुंडीला येऊन आईच्या कुशीत शिरली. सगळ्या भावांनी रुपाची मस्करी करत खोड्या केल्या की राणीसाहेब हमखास आईच्या कुशीत शिरणार हे ठरलेलेच.
आज आईच्या कुशीत शिरताच आई म्हणाली, “अगं, मस्करी करताहेत ते सगळे. फोटो बघ एकदा मुलाचा. अगदी साजेसा आहे तुला. बाबा आणि काका जाऊन आलेत त्यांच्याकडे, तुझा फोटो बघताच सगळ्यांना आवडली तू..शहरात चांगल्या पदावर नोकरीला आहे मुलगा. मुलाचे नाव काय बरं म्हणाले बाबा..( जरा विचार करत)….हा…. सुशांत गायकवाड..घराणे सुद्धा आपल्या सारखेच..उद्या तुला बघायला येणार आहेत..तुला मुलगा पसंत असला तरच पुढचं ठरवू….”
आईचं बोलणं ऐकून जरा लाजतच ती लिफाफा हातात घेत आपल्या खोलीत निघून गेली. आज का कोण जाणे पण त्याचा फोटो बघण्याची वेगळीच आतुरता लागली होती तिला. खोलीत एका खुर्चीवर बसून लाजर्या चेहऱ्याने ती फोटो लिफाफ्यातून बाहेर काढू लागली. हृदयाची धडधड अलगदपणे का वाढली तिला कळत नव्हते. तसाच त्याचा फोटो बघितला तशीच त्याच्या घार्या डोळ्यांवर तिची नजर स्थिरावली. दादाने वर्णन केले त्याच्या अगदीच विरूद्ध, दिसायला राजबिंडा, फोटोतही लक्षात येतील असे त्याचे घारे डोळे, काळ्याभोर केसांची हेअरस्टाईल अगदीच शाहीद कपूर सारखी. एकंदरीत तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला आज गवसला होता. असं आलेल्या स्थळांचे फोटो बघणं, त्या मुलाची सगळी माहिती ऐकणे काही पहिल्यांदा होत नव्हते पण आज सुशांतचा फोटो बघताच, त्याच एकंदरीत वर्णन ऐकता तिच्या मनात एकच भाव होता तो म्हणजे, “हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार..”
उगाच कितीतरी वेळ ती त्याचा फोटो निरखत बसलेली. स्वत:शीच हसत, लाजत एका वेगळ्याच विश्वात हरवली होती ती. तिच्या भावंडांनी तिचे भाव लपून छपून टिपले आणि घरात एकच दवंडी पिटत सांगितले, “रुपाला पोरगा आवडलेला दिसतोय…तासभर फोटो बघत बसली आहे ती…हसतेय काय…लाजतेय काय..”
ते ऐकताच घरातील प्रत्येक जण मनोमन आनंदी होत म्हणत होते, आता उद्या एकदा बघण्याचा कार्यक्रम झाला की सगळं सुरळीत होवो म्हणजे झालं. घरात सगळ्यांना दुसऱ्या दिवशीची आतुरता लागली होती.
इकडे रुपाला काही रात्रभर झोप लागत नव्हती. फोटो तर एव्हाना बाबांच्या ताब्यात गेलेला पण सुशांतचा चेहरा तिच्या सतत नजरेसमोर होता. अजून भेट सुद्धा झाली नाही मग का इतका विचार करते आहे मी असंही तिला वाटलं पण मन काही त्याच्या विचारातून बाहेर पडेना. रात्रभर स्वप्न रंगवत कशीबशी पहाटे ती झोपी गेली.
सकाळी जाग आली तशीच स्वतः ला आरश्यात बघून लाजतच ती स्वतःशीच पुटपुटली, “चला आज राजकुमार येणार आहे….तयार व्हा लवकर…” मनात एकीकडे आतुरता तर होती पण एक वेगळीच भितीही तिला वाटत होती. त्याने मला नाकारले तर…हाही विचार करून जरा मधूनच अस्वस्थता तिला जाणवत होती.
मोठ्या उत्साहाने काकूंच्या मदतीने ती तयार झाली. घरातला जो तो तिला चिडवत , मस्करी करत तिचं भरभरून कौतुक करत होते. लाल रंगाची जरी काठी साडी नेसून ती तयार झाली. लांबसडक केसांची वेणी, त्यावर मोगर्याचा गजरा, हातात मॅचिंग बांगड्या , कानात इवल्याशा कुड्या, गळ्यात नाजुक नेकलेस, कपाळावर इवलिशी टिकली तिच्या सौंदर्यात भर घालत होते. चेहऱ्यावर जराही मेकअप नसताना एखाद्या अप्सरेसारखी सुरेख ती दिसत होती.
पाहुणे मंडळी आली म्हणताच रुपाची धडधड वाढली. खोली वरच्या बाजूला असल्याने खिडकीतून मुख्य दरवाजा सहज दिसत होता. काकू तिला तयार करून खोलीबाहेर पडताच रुपा लपून छपून खिडकीतून डोकावून बघत होती आणि तितक्यात तिची नजर सुशांत वर गेली. आकाशी रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट परिधान केलेला सुशांत हळूच डोळ्यांवरचा गॉगल काढत असताना तिला दिसला तशीच ती त्याच्यावर फिदा. फोटो पेक्षा प्रत्यक्षात अजूनच हॅंडसम दिसत होता तो.
त्याने त्या अप्रतिम अशा वाड्यावर एक नजर फिरवली तशीच रुपा खिडकीतून लपून बघताना त्याला दिसली. दोघांची नजरानजर होताच ती भरकन बाजुला सरकली. पण त्याने ते घेरले, तिची एक झलक बघताच तिला बघण्यासाठी तो आतुर झाला होता.
रुपाची धडधड आता अजूनच वाढली. कितीतरी वेळा ती स्वतः ला आरश्यात निरखून बघत हसत लाजत होती.
काही वेळातच काकू तिला बैठकीत घेऊन जायला आल्या. ती जिन्यावरून जसजशी खाली उतरत होती तशीच तिच्या हृदयाची स्पंदने वाढत होती. खाली नजर ठेवून ती सगळ्यांसमोर आली. सुशांत तिला बघताच घायाळ झालेला. तिचं निरागस सौंदर्य, तिचा सुडौल बांधा, तिला शोभेसा तिचा लूक बघताच त्याला ती पहिल्या नजरेतच आवडली. सुशांत च्या आई बाबांनी तिला काही प्रश्न विचारले. सुशांत मात्र सगळ्यांची नजर चुकवत तिला न्याहाळत होता. तिचा सुमधुर आवाज त्याला अजूनच तिच्याकडे आकर्षित करत होता.
काही वेळाने घरातल्या मोठ्यांनी दोघांना एकत्र बोलायला बाजुला पाठवले. दादाच्या मदतीने दोघेही बैठकी बाजुच्या खोलीत बसले. रुपा लाजून चूर झाली होती. खाली नजर ठेवून बसलेल्या रुपाचे सौंदर्य निरखत सुशांत तिला म्हणाला , “खूप छान दिसत आहेस…”
लाजतच ती थॅंक्यू म्हणाली पण नजर काही त्याच्याकडे वळत नव्हती. मनात अनेक भावना होत्या पण या क्षणी काय बोलावं, कसं वागावं तिला सुचत नव्हतं. ती शांतता दूर करण्यासाठी सुशांत तिला एक एक प्रश्न विचारत तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. न राहवून तो तिला म्हणाला, ” हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध तर होत नाहीये ना…कारण मी एकटाच बोलतोय पण तू एक नजर सुद्धा मला बघत नाहीये..”
तशीच ती त्याला बघत म्हणाली, “नाही नाही मनाविरुद्ध अजिबात नाही…उलट तुमचा फोटो बघताच मला तुम्ही खूप आवडलात पण आता या क्षणी काय करावं खरंच मला सुचत नाहीये…”
दोघांची नजरानजर झाली आणि क्षणभर दोघेही एकमेकांच्या नजरेत बघतच राहिले. आपण काय बोलून गेलो हे लक्षात येताच जीभ चावत तिने परत त्याची नजर चुकवली तसंच त्याला काही हसू आवरलं नाही. आनंदी होत तो म्हणाला , “खरंच…इतका आवडलो मी..तरीच मघाशी खिडकीतून लपून छपून बघत होतीस मला..”
ते ऐकताच तिलाही हसू आलं शिवाय लाजून चूर सुद्धा झाली आणि एकमेकांना बघत दोघेही हसले.
आता ती जरा मोकळी झाली बघत दोघांनी एकमेकांविषयी जाणून घेण्याच्या दृष्टीने काही प्रश्न विचारले, अपेक्षा जाणून घेतल्या. तिच्या मनात एकच गाणे गुणगुणत होते,
“फुलले रे क्षण माझे फुलले रे….”
हा दिवस हे क्षण इथेच थांबावे आणि आम्ही असंच एकमेकांच्या नजरेत बघत गप्पा माराव्या असंच काहीसं झालेलं दोघांना. त्या पहिल्या भेटीतच दोघांनाही एकमेकांच्या भावना आपसूकच कळाल्या.
रुपाला स्वप्नातला राजकुमार भेटला होता, अगदी मनात आकृती कोरलेली तसाच तिला तो भासत होता. त्यालाही तिची प्रत्येक छबी घायाळ करत होती.
इथूनच त्यांच्या प्रेमाची एक गोड सुरवात झाली. घरच्यांनी मोठ्या थाटामाटात दोघांचे लग्न लावून दिले. अगदी फुलाप्रमाणे जपलेल्या रुपाला सासरी पाठवताना दादांना आज काही केल्या रडू आवरले नव्हते, आजोबा, बाबा आणि काका सगळ्यांची नजर चुकवत डोळे पुसत होते. आजी रडतच तिला म्हणाली, “परीकथेतला राजकुमार आमच्या राजकुमारीला गवसला..आता आनंदाने संसार करू बाळा…”
मिश्र भावनांनी रुपाने सुशांतच्या आयुष्यात पाऊल टाकले. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून तोही भावनिक झाला. तिचा हात हातात घेत सगळ्यांना म्हणाला, “काळजी करू नका, मी खूप आनंदात ठेवेल रुपाला..” त्याच्या हाताच्या स्पर्शाने, त्याच्या बोलण्याने रुपा मनोमन आनंदी झाली. समाधानाचे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवले तशीच त्याच्या चेहऱ्याकडे बघत ती मनातच म्हणाली,
” फुलले रे क्षण माझे फुलले रे….
फुलले रे क्षण माझे फुलले रे…
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने
सजले रे क्षण माझे सजले रे….”
अशी झाली दोघांच्या नात्याची सुरुवात.
ही प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?.
मी लिहीलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही. नावाशिवाय लेख शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed