मानसीचा आज पहिलाच दिवस होता कॉलेजमधला. कॉलेजच्या भल्या मोठ्या इमारतीचे निरीक्षण करताना ती एका वेगळ्या विश्वात रमलेली तितक्यात एक वाक्य कानावर पडले.
“हाय मानसी..!”
या अनोळखी कॉलेजमध्ये माझं नावं घेत कुणी हाक मारली असावी या विचाराने गोंधळून तिने मागे बघितले तर मागे विनय उभा होता. विनय आणि मानसी शाळेत एकाच वर्गात होते पण कधीच बोलणं वगैरे झालं नव्हतं. नावाने आणि चेहर्याने फक्त दोघांची ओळख होती. आज मात्र या अनोळखी कॉलेजमध्ये त्याला बघताच मानसी मनोमन आनंदी झाली.
“हाय विनय..तू इथे..म्हणजे तुला याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला का..”
तिच्या आश्चर्यकारक प्रश्नावर त्याने हो म्हणत उत्तर दिले तशीच ती अजूनच आनंदी झाली. या अनोळखी शहरात , कॉलेजमध्ये ओळखीची व्यक्ती भेटल्यावर किती बरं वाटलं तिला हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
विनय क्षणभर तिच्या गोड निरागस चेहऱ्याकडे बघतच राहिला. त्यालाही तिला तिथे बघून खूप आनंद झाला होता.
मानसी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, सडपातळ उंच बांधा, लांबसडक केसांची वेणी, साधे पण नीटनेटके राहणीमान. मानसी लहान असताना आई आजारपणाने देवाघरी गेली आणि वडीलांनी दुसरं लग्न केलं. तेव्हापासून मामा मामींनी तिला लहानाचं मोठं केलेलं.
बारावीपर्यंतचे शिक्षण जरा ग्रामीण भागात झाल्यावर आता पहिल्यांदाच ती शहरी वातावरण अनुभवत होती. मुळातच अभ्यासू, मेहनती असल्याने बारावीला उत्तम गुण मिळवून तिला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलेजच्या जवळच असलेल्या होस्टेलमध्ये ती राहणार होती. विनय हा तिचा पहिलाच मित्र.
हळूहळू ती या शहरी वातावरणात रमायला लागली.
होस्टेलमध्ये तिची रुममेट मोना हिच्याशी मानसीची लवकरच मैत्री झाली. मानसी मुळे मोना आणि विनयची सुद्धा ओळख झाली. तिघांचीही हळूहळू चांगली मैत्री झाली. एकमेकांना अभ्यासात मदत करणे, सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरणे सुरू झाले.
शाळेत असल्यापासूनच शांत, सालस, निरागस मानसी विनयला खूप आवडायची पण कधी बोलणं सुद्धा झालं नव्हतं. आता योगायोगाने दोघे एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे मैत्रीचं नातं त्यांच्यात निर्माण झालेलं. विनयच्या मनात आपल्याविषयी प्रेमाची भावना आहे याची जराही कल्पना मानसीला नव्हती. विनय सुद्धा तिला काही जाणवू देत नव्हता. योग्य वेळ आली की मानसीला प्रपोज करायचे असे त्याने ठरवले होते.
विनय उंचपुरा, दिसायला साधारण पण आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला, स्वभावाने प्रेमळ, मदतीला धावून जाणारा. कुणालाही आपलसं करेल असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. यामुळेच मोनाला पहिल्या भेटीतच विनय खूप आवडला होता. जसजशी मैत्री घट्ट झाली तशीच मोना विनयच्या प्रेमात पडली. त्याच्या मनात मात्र मानसी होती.
कॉलेजचे पहिले वर्ष संपत आले होते. पुढच्या आठवड्यात मानसीचा वाढदिवस होता. तिच्यासाठी काही तरी खास प्लॅन करून तिचा वाढदिवस अविस्मरणीय बनविण्याचा विचार विनयच्या डोक्यात सुरू होता. या सगळ्यात मोनाची मदत घ्यायची असे त्याने ठरवले आणि त्यासाठी विनयने मोनाला फोन केला. त्याने तिला एकटीला भेटायला बोलावले शिवाय याविषयी मानसीला काही सांगू नकोस असंही सांगितलं. ते ऐकताच मोनाच्या मनात आनंदाने लाडू फुटायला लागले.
विनय ने कशासाठी बोलावले असेल, त्याचेही माझ्यावर प्रेम असेल का ? त्याविषयी तो काही बोलणार असेल का? अशे अनेक प्रश्न मोनाच्या मनात गोंधळ निर्माण करायला लागले. त्याला पहिल्यांदाच असं एकट्यात भेटायचं म्हंटल्यावर ती छान तयार झाली. मोनाला असं चार वेळा आरश्यात स्वतः ला निरखून बघत, लाजत लाजत तयार होताना बघून मानसीने तिला विचारले,” काय मॅडम, आज काय खास..छान दिसतेस पण निघाली कुठे..तेही मला न सांगता, मला एकटीला रूमवर सोडून?”
काही खास नाही गं, शाळेतली मैत्रिण भेटायला येतेय म्हणून जरा बाहेर जाऊन येते तासाभरात असं मानसीला सांगून ती बाहेर पडली.
ठरलेल्या ठिकाणी विनय पाठमोरा उभा तिला दिसला. त्याची पाठमोरी आकृती बघतच ती त्याच्या दिशेने निघाली. जसजशी जवळ जात होती तशीच तिची धडधड वाढली होती. चेहऱ्यावर लाजरे भाव होते. ती जवळ पोहोचताच ती लाजतच म्हणाली,
“विनय… उशीर झाला का रे मला..बराच वेळ वाट बघतोय का..”
तिचा आवाज ऐकताच तो तिच्याकडे वळून म्हणाला, “हाय मोना… अगं नाही..मी जरा लवकर पोहोचलो..तू वेळेत आलीस..बरं आपण त्या पुढच्या बाकावर बसूया का? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी.”
ते ऐकताच ती अजूनच लाजून चूर झाली. दोघेही जवळच्या एका बाकावर जाऊन बसले. बसताना नकळत त्याच्या हाताचा स्पर्श तिला झाला तशीच ती क्षणभर एका विश्वात रमली. काय बोलणार असेल विनय असा विचार करत जरा अस्वस्थ सुद्धा झाली. आपण विनय साठी छान तयार होऊन आलोय पण ह्याने नीट बघितलं सुद्धा नाही किंवा काही प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही म्हणून तिला जरा त्याचा रागही आला.
विनय मोनाला म्हणाला, ” मोना, आज तुला मी माझं एक सिक्रेट सांगायला बोलावलं आहे. खूप दिवसांपासून एक गोष्ट माझ्या मनात आहे आणि आज तुझ्यासोबत ती गोष्ट शेअर करणार आहे.”
विनयचे हे शब्द ऐकताच मोना मनोमन आनंदी झाली. आता विनय आपल्याला बहुतेक प्रपोज करणार असं तिला वाटलं. ज्याच्यावर मी मनोमन प्रेम करते त्याच्या मनात सुद्धा आपल्या विषयी अगदी त्याच भावना आहे, आणि तो आज चक्क व्यक्त होतोय.. यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असा काहीसा विचार करून ती अगदी गुलाबी स्वप्न बघितल्या प्रमाणे अत्यानंदी झालेली होती.
त्याच्या बोलण्यावर फक्त गोड स्माइल देत ती ऐकत होती. तो पुढे म्हणाला, “मोना, माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे…अगदी मनापासून प्रेम. मी आज पर्यंत तिला याविषयी जाणवू दिले नाही पण आता मला ते व्यक्त करायचे आहे. तुला माहित आहेच की मानसी आणि मी शाळेपासूनच एकत्र शिकलो पण मैत्री मात्र कॉलेजमध्ये आल्यावर झाली. पण मला शाळेपासूनच ती आवडते. माझं खरंच खूप प्रेम आहे मानसी वर. मला आता ते व्यक्त करायचे आहे. पुढच्या आठवड्यात तिचा वाढदिवस आहे तेव्हा खास काही तरी प्लॅन करून तिच्या विषयीच्या माझ्या मनातील भावना मला तिला सांगायच्या आहेत. यासाठी मला तुझी मदत हवी आहे. करशील ना मला मदत. ”
हे ऐकताच गुलाबी स्वप्न रंगवत असलेल्या मोनाचे मन अगदी क्षणभरात तुटले. असं काही असेल याची तिला जराही शंका आली नव्हती. ज्या विनय वर आपलं प्रेम आहे तो आपल्या समोर दुसऱ्या मुलीवरील प्रेमाविषयी बोलतोय हे तिला सहनच होत नव्हते. तिला अगदी मोठ्याने रडून त्याला सांगावं वाटत होतं की विनय अरे तू माझा आहेस, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर…पण त्याने जे काही सांगितले ते ऐकून तिला धक्का बसला. काय प्रतिक्रिया द्यावी तिला कळत नव्हते.
विनय तिच्या डोळ्यापुढे उभा होऊन म्हणाला, “मोना, प्लीज करशील ना मला मदत..”
त्यावर कसंबसं ती “हा..” म्हणाली.
विनय बरंच काही बोलत होता पण मोनाचे त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. ती मनोमन रडत होती, दु:खी झाली होती. प्रेमभंग काय असतो याची जाणीव तिच्या या क्षणी झालेली.
या क्षणी कुछ कुछ होता है मधल्या काजोल प्रमाणे आपली अवस्था झाली याची जाणीव तिला झाली. तिचं मन अगदी या गाण्या प्रमाणे रडत होतं.
“रब्बा मेरे, इश्क किसी को ऐसे ना तडपाये, होय
दिल की बात रहे इस दिल में, होठों तक ना आये
ना आये….
तुझे याद ना मेरी आयी किसी से अब क्या कहना
तुझे याद ना मेरी आयी किसी से अब क्या कहना
दिल रोया की अंख भर आयी
दिल रोया की अंख भर आयी किसी से अब क्या कहना…”
विनय मानसी जवळ प्रेम व्यक्त करेल का? मानसी या प्रेमाचा स्वीकार करेल का..मोना हा धक्का कसा सहन करेल..मानसी आणि मोनाच्या मैत्रीत यामुळे फूट पडेल का… याची उत्सुकता तुम्हाला लागली असणार ना..
तर हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागात.
पुढचा भाग लवकरच.
कथेचा हा भाग कसा वाटला, पुढे काय होईल याविषयी तुमचा अंदाज अशा प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा 😊
मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed