रघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठेवले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना पैशाची चणचण भासू लागली. आता किशन ला घरी सोडून कामावर कसं जायचं म्हणून तो एका वर्षाचा झाला तसाच सविता ने रघू जायचा त्या बांधकामांच्या ठिकाणी काही काम मिळते का याची चौकशी केली आणि योगायोगाने तिलाही काम मिळाले. कामाच्या ठिकाणी साडीची झोळी बांधून किशन ला झोपवून ती रघूला कामात मदत करायची. त्याची तहान भूक झोप सांभाळत काम करताना ती दमून जायची. रघूला तिची अवस्था कळायची, तू काम नाही केलं तरी चालेल असं तो म्हणायचा पण तितकाच संसाराला , पोराच्या भविष्याला हातभार म्हणून ती राब राब राबायची.
जिकडे काम मिळेल तिकडे भटकायचं , बांधकाम संपले की स्थलांतर करत दुसरे काम शोधायचे असा त्यांचा संसार, एका ठिकाणी स्थिर होणे जवळजवळ अशक्यच. अशातच सविता दुसऱ्यांदा गरोदर राहिली, तिच्याकडून कष्टाचे काम अशा परिस्थितीत होत नव्हते. किशन एव्हाना तीन वर्षांचा झाला होता. अशा परिस्थितीत अवघड काम नको म्हणून ती घरीच असायची.
भराभर नऊ महिने निघून गेले आणि सविताला मुलगी झाली. कन्यारत्न घरात आल्याने किशन, रघू सगळेच खूप आनंदात होते. अख्ख्या मजुरांना रघू आणि किशन ने साखर वाटलेली. सविता ची आई मदतीला तिच्या जवळ आलेली होती.
लेक वर्षाची होत नाही तितक्यात त्यांच्या सुखी संसारात संकट उभे राहिले. काम करताना रघू पाय घसरून सातव्या मजल्यावरून खाली पडला आणि क्षणातच सगळं संपलं. तिथलाच एकजण धावत सविताच्या घरी आला आणि रडक्या सुरात म्हणाला, “भाभी, अस्पताल चलो..रघू उपर से गिर गया..उसको अस्पताल लेके गये है..”
ते ऐकताच सविताचा धक्का बसला, रडू आवरत , देवाचा धावा करत काळजाची धडधड वाढत अताना कडेवर मुलगी दुर्गा आणि एका हातात किशनचा हात पकडून ती त्या मजुराच्या मागोमाग दवाखान्यात पोहोचली. तिची नजर सैरावैरा रघूला शोधत होती, कामावरच्या बर्याच सहकार्यांची गर्दी तिथे झाली होती. इतक्या उंचावरून पडल्याने रघू जागेवरच मृत झाला असं डॉक्टरांनी सांगितल्यावर सविताचा टाहो फुटला. इवली इवली दोन मुलं पदरात टाकून रघू आपल्याला सोडून गेला ही कल्पनाच तिला करवत नव्हती. कुणी म्हणे त्याला उन्हाची चक्कर आली तर कुणी म्हणे तोल गेला. पोलिसांनी तर आत्महत्या असू शकते म्हणत चौकशीही केली पण काही झालं तरी रघू तर परत येणार नव्हता. सविताला ही परिस्थिती सांभाळणे खूप कठीण झाले होते. किशन तिचे डोळे पुसत म्हणाला, “आई, बाबा कुठं गेले..आता परत नाही येणार का..” त्याला कवटाळून ती ढसाढसा रडली पण आता पदर खोचून कामाला सुरुवात केली पाहिजे, या इवल्या जीवांसाठी म्हणत तिने स्वतःला सावरलं. परत काही धुणीभांडी, इतर घरकाम करत संसार चालवायला सुरुवात केली. रघूच्या आठवणीने रोज रडायची पण सकाळी लेकरांचे चेहरे पाहून कामाला लागायची. सासर माहेरचे येत जात असायचे, गावी चल म्हणायचे पण कुणावर भार नको, माझं मी बघते म्हणत ती सगळ्यांना दुरूनच रामराम करायची. किशनला तिने शाळेत घातलं, गरजेनुसार शिकवणी लावून दिली. त्याच्या पाठोपाठ दुर्गा सुद्धा शाळेत जाऊ लागली. सविता शक्य ते काम करून सगळा घरखर्च चालवायची. असेच वर्ष जात होते. आता वयानुसार सविताचे शरीर थकले होते पण मुलं स्वतः च्या पायवर उभे होत पर्यंत कष्ट करणे तिच्या नशिबी आले होते. दुर्गा वयात आली तशीच सविताची धडधड अजून वाढत होती. बाप नसताना आईच्या लाडाने पोरं बिघडली असं कुणी म्हणू नये म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच ती काळजी घेत होती. काय चूक काय बरोबर ते वेळोवेळी दोन्ही मुलांना समजून सांगत होती. आजुबाजूला राहणारे, उनाडक्या करणार्या पोरांच्या नादी आपला किशन लागू नये म्हणून कामात व्यस्त असली तरी वेळेनुसार ती कडक ही व्हायची. दोन्ही मुलांना आई विषयी एक आदरयुक्त भिती होती शिवाय परिस्थितीची जाणीव सुद्धा होती.
दुर्गा आता घरकामात मदत करून अभ्यास सांभाळायची त्यामुळे सविताला जरा मदत व्हायची. किशन सुद्धा बाहेरचे काम, व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायचा. आपली मुलं वाईट वळणाला न लागता सगळ्या व्यवहारात तरबेज असावे , स्वतः च्या पायावर उभे असावे असं सविताचं स्वप्न होतं आणि प्रयत्नही. किशन फर्स्ट क्लास मध्ये दहावी उत्तीर्ण झाला, सविताला त्या दिवशी रघूची खूप आठवण झाली. आता तंत्रनिकेतन महाविद्यालयात दहावीनंतर प्रवेश घेऊन त्याने इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे त्या बळावर त्याला बरेच कामे मिळायला सुरुवात झाली. आई आता तू काम सोडून दे, आराम कर असं म्हणत किशनने त्याची पहिली कमाई आईजवळ दिली, त्या क्षणी तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दुर्गा सुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रात पदवी अभ्यासक्रमाला होती सोबतच सरकारी नोकरीसाठी परिक्षा देत त्याचीही तयारी ती करीत होती.
हलाखीच्या परिस्थितीत एकटीने दुहेरी भूमिका सांभाळत मुलांना चांगले वळण लावताना तिला पदोपदी रघूची आठवण यायची. कधी अगदीच मृदू तर कधी अगदीच कठोर मन करून कडक राहून संगोपन करताना तिची फार तारांबळ उडायची. आजुबाजूच्या लोकांचे टोमणे, वाईट नजरा यावर मात करीत पाण्यापावसात कष्टाचे काम करून तिने मुलांना घडवलं होतं. सोबतच मुलीच्या लग्नाची , भविष्याची तरतूद म्हणून जरा बचतही केली होती. या सगळ्यातून जाणे खरंच किती अवघड आहे हे तिलाच माहीत होते.
दररोज रघूचा फोटो बघून ती अश्रू गाळायची, अजूनही त्याच्या आठवणी ताज्या होत्या. कुठलीही चांगली गोष्ट घडली की ती त्याच्या फोटो जवळ जाऊन आनंदाने त्याला सांगायची. आज दोन्ही मुलांची प्रगती बघून ती एकटक रघूच्या फोटोला बघत मनात खुप काही बोलली त्याच्याशी.
खरंच जेव्हा आईला सविता प्रमाणे दुहेरी भूमिका पार पाडावी लागते तेव्हा तिची अवस्था फक्त तिलाच कळत असते. लोकांचे बरे वाईट अनुभव, टोमणे सांभाळत मुलांना घडवणे सोपे नाही. त्यात आजूबाजूला सुशिक्षित वातावरण नसताना मुलगा वाईट वळणावर जाऊ नये शिवाय वयात आलेल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करुन घडवणे, स्वबळावर लढण्यासाठी सज्ज करणे किती महत्त्वाचे आहे, हे सगळं करताना कधी आई तर कधी बाबा बनून राहणे गरजेचे आहे. वास्तविक आयुष्यात अशी परिस्थिती बर्याच ठिकाणी दिसते, अशा परिस्थितीत एकटीने मुलांना घडवणे खरंच खूप कौतुकास्पद आहे.
याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed